
नरेंद्र मोदी हे ‘आरएसएस’चे पंतप्रधान असल्याचे खळबळजनक ट्विट करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपने टीका केली. राहुल गांधी हेच ‘झुठों के सरदार’ आहेत. केंद्र आणि राज्यात त्यांचे सरकार असताना त्यांच्याच पक्षाने आसाममध्ये तीन डिटेन्शन सेंटर उभारली होती, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात पत्रकार परिषद बोलावून पात्रा यांनी राहुल गांधींच्या ट्विटचा समाचार घेतला. आसाममध्ये डिटेन्शन सेंटर उभारलीत, असा उल्लेख असलेले अधिकृत पत्रक त्यांनी या वेळी पत्रकारांना दाखवले. 2011 साली सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने हे पत्रक जारी केले होते, असे पात्रा यांनी सांगितले. राहुल गांधींना कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही. परंतु त्यांना प्रत्येक विषयावर बोलायचे असते, असा आरोपही पात्रा यांनी केला.




























































