लोकसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर गडबड घोटाळा, निवडणूक आयोग मेलाय; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

आपल्या देशाचा निवडणूक आयोग मेलाय, लोकसभा निवडणूकीत 70 ते 80 जागांवर घोटाळा झालाय व तो येत्या काही दिवसात आम्ही सिद्ध करून दाखवू, असा घणाघात काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे काँग्रेसचे वार्षिक लिगल कॉनक्लेव्ह 2025 सुरू आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोग व मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

”आपल्या देशाची निवडणूक यंत्रणा मेलीय. लोकसभा निवडणूकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच कमी मेजॉरिटीने पंतप्रधान झाले आहेत. 10 ते 15 जागांवर फसवणूक झाली असे बोलले जाते, पण आम्हाला तर असं वाटतं की 70 ते 80 जागांवर फसवणूक झाली आहे. जर आताही दहा ते बारा जागा इथे तिथे झाल्या तर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत”, असे ते म्हणाले.

निवडणूकीत घोटाळा सिद्ध करणार

लोकसभा निवडणूकीत कशा प्रकारे घोटाळा झाला ते दाखवून देणार असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. ”आम्ही पुढच्या काही दिवसात जनतेला दाखवून देऊ की लोकसभा निवडणूकीत कशाप्रकारे घोटाळा झाला आहे. आम्ही ते सिद्ध करणार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

राजा ही संकल्पना अमान्य

राहुल गांधी हे भाषणासाठी उभे राहताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हमारा नेता कैसा हो, अशा घोषणा दिल्या. त्यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना रोखलं व ते म्हणाले की, मी राजा नाही, मला राजा बनायचं देखील नाही. मी या राजा संकल्पनेच्याच विरोध आहे असे म्हणत त्यांनी एक प्रकारे हुकुमशाहीला विरोध केला असे सांगितले जात आहे.