
‘‘मतदार वाढवून आणि कमी करून निवडणूक कशी चोरली जाते याची सगळी माहिती आम्ही काढली आहे. कर्नाटकात आम्ही निवडणूक आयोगाची ही चोरी पकडली आहे. त्यासाठी तब्बल सहा महिने आमच्या कार्यकर्त्यांनी रिसर्च केला,’’ असा गौप्यस्फोट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
बिहारमधील मतदार यादी फेर पडताळणीच्या मुद्दय़ावर संसद भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘प्रश्न फक्त बिहारचा नाही. महाराष्ट्रातही मोठी फसवणूक झाली आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी तब्बल 1 कोटी मतदार जोडले गेले. निवडणूक निकालानंतर आम्ही आयोगाकडे मतदार यादी मागवली होती. मतदान केंद्रांवरील व्हिडिओ मागितले होते, मात्र आम्हाला ते दिले गेले नाहीत. पोलखोल होऊ नये म्हणून व्हिडिओग्राफीचा कायदाच बदलून टाकला,’’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
भाजपचा गेम आम्हाला समजलाय!
राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका मतदारसंघाचे उदाहरण देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. ‘‘आम्ही कर्नाटकातील एक मतदारसंघ निवडला आणि तिथल्या मतदारसंख्येचा अभ्यास केला. हा रिसर्च करण्यासाठी आम्हाला 6महिने लागले. नवे मतदार कसे बनवले जातात? मतदान कोण करते? जास्तीची मते कुठून येतात? हे सगळे समजून घेतले. भयंकर चोरी पकडली आहे. सगळे काही स्पष्ट आहे. भाजपचा गेम आम्हाला समजला आहे. निवडणूक आयोगाला आम्ही हे सांगू शकतो,’’ असे राहुल गांधी म्हणाले.
‘‘कर्नाटकात आम्ही चोरी पकडल्यामुळे आता बिहारमध्ये नवी स्ट्रटेजी वापरली जातेय. पूर्ण सिस्टीमच बदलली जातेय. काही मतदार वगळायचे आणि नवे घुसवायचे असा मामला आहे. हिंदुस्थानात निवडणुका चोरल्या जात आहेत. हेच वास्तव आहे.’’