महात्मा गांधींचे विचार आणि गरीब या दोन गोष्टींचा मोदी द्वेष करतात; राहुल गांधी यांचा निशाणा

महात्मा गांधी यांच्या नावे असलेल्या ’मनरेगा’च्या जागी मोदी सरकार नवी ग्रामीण रोजगार हमी योजना आणणार आहे. ’विकसित भारत जी राम जी’ नावाने ही योजना ओळखली जाणार असून त्या संदर्भातील विधेयक चालू हिवाळी अधिवेशनातच सादर केले जाणार आहे. त्याविरोधात आज काँग्रेसने संसदेच्या आवारात आंदोलन केले. तसेच त्याबाबत ट्विट करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

मनरेगा महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराजच्या स्वप्नाचे जीवंत रुप आहे. कोट्यवधी ग्रामीण नागरिकांच्या जीवनाचा सहारा आहे. कोविड काळात त्यांचे आर्थिक सुरक्ष कवच होते. पण प्रधानमंत्री मोदीजींना ही गोष्ट कायम खटकत होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून या योजनेला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज ते मनरेगाचे नाव पुसून काढण्यासाठी उतावीळ आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

हे नवीन बिल महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान आहे. मोदी सरकारने पहिलेच बेरोजगारीचा सामना करणाऱ्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. आणि आता हे बिल आणून ग्रामीण भागातील गरीबांची सुरक्षित रोजी- रोटी पण संपवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही या जनविरोधी बिलाचा गावाच्या गल्ल्यांपासून संसदेपर्यंत विरोध करू, असेही राहुल गांधी म्हणाले.