Operation Sindoor – दाल में कुछ काला है, ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविरामासंदर्भातील दाव्यांवरून जोरदार टीका केली आहे.

ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की, त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवला आणि यामुळे संभाव्य अण्वस्त्र युद्ध टळले. मात्र हिंदुस्थानने युद्धविराम हा दोन्ही देशांमधील थेट सैन्य संवादातून झाल्याचे सातत्याने सांगितले आहे. यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर मौन बाळगल्याचा आरोप करत, दाल में कुछ काला,” असे विधान केले आहे.

संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान सांगतात की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि आपण विजयी झालो आहोत. पण दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प 25 वेळा म्हणाले आहेत की, त्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवले. यात काहीतरी गडबड आहे. पंतप्रधानांनी यावर एकदाही स्पष्टीकरण का दिले नाही? हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे.” त्यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांना 73 दिवसांत 25 वेळा पुनरुच्चार झाल्याचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी यावर संसदेत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.