
गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मंगळवारी सुलतानपूर येथील एमपी/एमएलए न्यायालयाने समन्स बजावले आहे. राहुल गांधी यांना 19 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. वर्ष 2018मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी अमित शहा हे हत्येचे आरोपी असल्याचे म्हटले होते. त्याविरोधात त्यांच्यावर भाजपचे नेते विजय मिश्रा यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.
आज याप्रकरणी सुमारे 40 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले. न्या. शुभम वर्मा यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याची संधी दिली आहे. सुनावणीदरम्यान राहुल गांधींचे वकील काशी शुक्ला यांनी साक्षीदार रामचंद्र दुबे यांची उलटतपासणी पूर्ण केली.


























































