
रिझर्व्ह बँकेकडे असलेले 1.76 लाख कोटी रुपये केंद्राला देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. या निर्णयावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप केला आहे की त्यांना आर्थिक संकटाची चाहूल लागली नाही. रिझर्व्ह बँकेचे पैसे चोरून काही उपयोग नाही असंही ते म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून त्यात त्यांनी म्हटले आहे की “आपल्यामुळे तयार झालेलं आर्थिक संकट दूर कसं करायचं याचा पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना पत्ताच नाहीये.” आता रिझर्व्ह बँकेकडून पैसा चोरून काही होणार नाही, हे म्हणजे गोळीबारामुळे झालेली जखम चोरलेल्या बँडएडने झाकण्यासारखं आहे असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याप्रमाणेच काँग्रेसनेही पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सवाल केला आहे की या पैशांचा वापर भाजपच्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी केला जाणार आहे का ? हा आर्थिक समजूतदारपणा आहे की आत्महत्या असा प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी याबाबत बोलताना म्हटले की रिझर्व्ह बँकेकडून ही रक्कम घेणं हे देशाची आर्थिक स्थिती खराब असल्याचं लक्षण आहे. त्यांनीही सुरजेवाला यांच्याप्रमाणे प्रश्न विचारला आहे की केंद्र सरकार या पैशांचं नेमकं काय करणार आहे?

























































