
निवडणूक भाजपचा हस्तक, चोरी आणि त्यांची एक शाखा अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाची माहिती वापरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची चोरी पकडली असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की काल दिल्लीत स्नेहभोजन झालं. या स्नेहभोजनाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होत्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मी सुद्धा त्या स्नेहभोजनाला उपस्थित होतो. राहुल गांधींनी आम्हाला सुद्धा मत चोरीचं एक सादरीकरण दिलं होतं. ते सुद्धा धक्कादायक होतं. आणि स्नेहभोजनानंतर महत्त्वाच्या विषयावर बैठक घेतली आणि चर्चा केली.
निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक, नोकर आहे. राहुल गांधींनी दिलेली माहिती ही स्वतःची नव्हती. ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. राहुल गांधींनी हीच माहिती वापरून निवडणूक आयोगाचा हा गुन्हा शोधून काढला. निवडणूक आयोगाची माहिती वापरून निवडणूक आयोगाची चोरी पकडली आहे. यात शपथपत्राचा प्रश्न येतो कुठे? असे संजय राऊत म्हणाले.
मतदान चोरी करत जे जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चीप आहे, सडके बटाटे आहेत हे दिसतंय. तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेले नाही आहात हे राहुल गांधींनी सांगितले. नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलं आहे राहुल गांधींनी. ट्रम्प यांच्यापुढे मोदी यांनी कशी शरणागती पत्करली हे राहुल गांधींनी सांगितले आहे. यांच्या डोक्यात चीप असती तर ट्रम्प यांच्यापुढे शरणागती पत्करली नसती.
निवडणूक आयोग खोटं बोलतोय, निवडणूक आयोग हा भाजपचा गुलाम आहे. चोराला चोर साथीदार आहे. ही सगळी माहिती, चोरीचे पुरावे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहे. त्यातून हे संशोधन करून लाखो मतं कशी चोरली हे राहुल गांधींनी दाखवलं आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरची माहिती वापरून निवडणूक आयोगाची चोरी राहुल गांधींनी दाखवली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे की त्यांनी मतांची चोरी नाही केली. निवडणूक आयोग ही भाजपची एक शाखा आहे. टीएन शेषन यांची हा निवडणूक आयोग नाहिये. आजचे निवडणूक आयुक्त कोण आहेत. सहकार मंत्रालयात हे अमित शहांच्या किती जवळ होते हे सगळ्यांना माहित आहे. प्रकाश आंबेडकर जे राजकारण करत आहेत ते त्यांच्या दृष्टीने योग्य असेल, पण त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो. शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.




























































