भाजपवाल्यांनो तयार रहा, आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार; मोदींना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही! मतदार यात्रेची सांगता करताना राहुल गांधी यांचा इशारा

‘माधोपुरामध्ये आम्ही फक्त ऍटम बॉम्ब दाखवला होता. भाजपवाल्यांनो, तयार राहा. आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. तुमच्या मतचोरीचे सत्य देशासमोर आल्याशिवाय राहणार नाही,’ असा सणसणीत इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिला. हायड्रोजन बॉम्ब फुटल्यानंतर नरेंद्र मोदी देशाला चेहरा दाखवू शकणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावले.

मतचोरी आणि मतदार फेरतपासणीच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये काढण्यात आलेल्या मतदार अधिकार यात्रेचा आज समारोप झाला. त्या वेळी उपस्थित जनसमुदायाला त्यांनी संबोधित केले. या वेळी त्यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. यात्रेच्या दरम्यान अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. तो संदर्भ देत राहुल यांनी भाजपला इशारा दिला.

यात्रेने देश जागवला – खरगे

बिहारमध्ये 15 दिवस चाललेल्या या यात्रेने संपूर्ण देश जागवला आहे. भाजपने अनेक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले. आमच्या कार्यालयावर हल्ले केले, पण बिहारच्या जनतेने ही यात्रा यशस्वी करून दाखवली, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. मोदी सरकारने मागच्या 11 वर्षांपासून इन्स्टॉलमेंट पद्धतीने लोकशाही संपवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यासाठी चोरीच्या नवनव्या पद्धती आणल्या आहेत. आधी गरीबांचे कोटय़वधी मित्रांना वाटले. नफ्यातील सरकारी कंपन्या त्यांना दिल्या. नंतर त्यांच्या पैशाच्या बळावर विरोधकांची सरकारे पाडली. हे आता चालणार नाही. आता बिहारची जनता डबल इंजिन सरकारला उखडून फेकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बिहारच्या आवाजाला देशाचा प्रतिसाद मिळतो! – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी भूमिका मांडली. ‘बिहारने जेव्हा कधी आवाज उठवला, देशाने त्यास प्रतिसाद दिला आहे. मग ते महात्मा गांधी यांचा चंपारण्यचे आंदोलन असो, लोहियांचे समाजवादी आंदोलन असो किंवा जयप्रकाश यांचा संपूर्ण क्रांतीचा नारा असो. प्रत्येक वेळी त्यांचे प्रतिध्वनी उमटले आहेत. मतदार अधिकार यात्रेच्या बाबतीतही त्याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

फॅक्टरी गुजरातमध्ये आणि व्हिक्ट्री बिहारमध्ये हवी – तेजस्वी यादव

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ‘नरेंद्र मोदी हे फॅक्टरी गुजरातमध्ये टाकतात आणि त्यांना व्हिक्ट्री बिहारमध्ये हवी आहे. असे करून ते बिहारला चुना लावण्याच्या प्रयत्नात आहेत, पण हे त्यांना शक्य होणार नाही. बिहारची जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला.

क्रांतीचा आवाज चीनपर्यंत गेला पाहिजे – संजय राऊत

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. ‘राहुल गांधी व तेजस्वी यादव यांच्या मतदार अधिकार यात्रेने क्रांतीची मशाल पेटवली आहे. या क्रांतीचा आवाज चीनपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण, आमच्या मतचोरांचे सरदार तिथे बसले आहेत,’ असा खोचक टोला राऊत यांनी हाणला. ‘महाराष्ट्रात मतांच्या चोरीचा आणि हेराफेरीचा अनुभव आम्ही स्वतः घेतला आहे. देशाच्या अन्य राज्यांत अशा चोऱया होऊ नयेत हा या यात्रेचा उद्देश होता आणि तो यशस्वी झाला आहे. बिहारच्या यात्रेत केवळ बिहारी जनताच चालली नाही तर संपूर्ण देश चालला. हा एक ऐतिहासिक प्रयोग होता. बिहारच्या धर्तीवर आता देशातील प्रत्येक राज्यात मतदार अधिकार यात्रा निघेल, असे राऊत यांनी सांगितले.

संविधानाची हत्या रोखणार

मतचोरी केल्यावर उद्या ते तुमची जमीन, रेशनकार्डही घेऊन जातील आणि अदानी-अंबानींना देतील, असा इशारा राहुल यांनी दिला. ज्या शक्तींनी महात्मा गांधी यांची हत्या केली, तेच लोक आता संविधानाची हत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्ही तसे होऊ देणार नाही. त्यासाठीच आम्ही ही यात्रा काढली, असे राहुल गांधी म्हणाले.