
>> राहुल गोखले
विज्ञानाच्या ज्या अनेक शाखा आहेत, त्यांतील मानवी शरीराच्या चयापचय क्रियांपासून पेशींच्या अभ्यासापर्यंतचा प्रांत हा जीवशास्त्रात मोडतो. साहजिकच या शाखेत होणारे संशोधन हे थेट मानवी शरीराच्या निरामयतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. असे दिशादर्शक संशोधन करणाऱया, जागतिक दर्जाच्या दहा निवडक जीवशास्त्रज्ञांचा परिचय डॉ. सुनील विभुते यांनी प्रस्तुत पुस्तकात (प्रकाशकः इंडस सोर्स बुक्स) करून दिला आहे. त्यांनी लिहिलेल्या जागतिक दर्जाचे निवडक रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ या पुस्तकांच्या मालिकेतील हे तिसरे पुस्तक.
लेखकाने काही परदेशी, तर काही भारतीय शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला आहे. उक्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन हे एचएमएस बीगल जहाजावर निसर्गतज्ञ म्हणून गेले आणि दक्षिण अमेरिकेचे सर्वेक्षण करून हे जहाज परतले तेव्हा डार्विन शास्त्रज्ञ बनले होते असे लेखक लिहितो. हे स्थित्यंतर कसे घडले यावर लेखक प्रकाश टाकतो. डार्विनची निरीक्षण शक्ती, त्याने ठेवलेल्या नोंदी अधोरेखित करतानाच उक्रांतीवादाच्या सिद्धांताची पायाभरणी कशी रचली गेली याचा रंजक आढावा लेखक घेतो. स्पेनमध्ये जन्मलेले सान्तियागो रॅमोन वाय काजल यांनी मेंदू व मज्जारज्जूविषयी केलेल्या संशोधनाची माहिती लेखकाने दिली आहे.
चेतासंस्थांवरील संशोधनात परस्परविरोधी निष्कर्ष काढूनही काजल व गॉलगी या दोघांना 1906 मधील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आला तरी कालांतराने अधिक पुरावे मिळाले तेव्हा काजल यांचा सिद्धांत योग्य होता हे सिद्ध झाले हा पट लेखक उलगडून दाखवितो.
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आपला भाऊ व वडील यांच्या मृत्यूचे धक्के सहन केलेले ओसवाल्ड अव्हरी हे डॉक्टर होते, पण औषधोपचार करूनही काही रुग्ण बरे का होत नाहीत या जिज्ञासेतून ते सूक्ष्मजीवाणूंच्या संशोधनाकडे वळले. त्यांनी केलेल्या संशोधनाची ठळक वैशिष्टय़े कथन करून लेखकाने ‘अनुवंशिकता, गुणसूत्रे, जनुके, डीएनए अशा घटकांचा अभ्यास सुरू होतो तेव्हा ओसवाल्ड हे नाव सर्वप्रथम येते’ असे नमूद केले आहे. रोझालिंड फ्रँकलिनविषयी लेखकाने विस्ताराने लिहिले आहे. डीएनएच्या संशोधनाचे श्रेय जेम्स वॅटसन व फ्रान्सिस क्रिक यांना देण्यात येते, पण एक्सरे क्रिस्टलोग्राफी या तंत्राचा उपयोग करून डीएनएच्या अचूक संरचनेच्या शोधात सिंहाचा वाटा असूनही दुर्दैवाने फ्रँकलिन दुर्लक्षित राहिली. कर्करोग झाल्याने तिला अल्पायुष्य लाभले. तिचा मृत्यू 1958 मध्ये झाला, तर वॅटसन व क्रिक यांना 1962 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. या एका अर्थाने कमनशिबी संशोधिकेच्या योगदानावर लेखकाने दृष्टिक्षेप टाकला आहे. आपल्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या विकारावर परिणामकारक औषध शोधून काढण्याचा पण करणारे जेम्स व्हाईट ब्लॅक यांनी प्रोपेनेलॉल नावाचे औषध विकसित केले याची कहाणी खिळवून ठेवणारी. त्या औषधाची दरवर्षी लक्षावधी डॉलरची विक्री होते त्यावरूनच ते ‘नोबेल-विजेते’ संशोधन मानवी आरोग्याच्या दृष्टीने किती प्रभावी ठरले याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. गंध येतो म्हणजे शरीरात नेमक्या कोणत्या क्रिया घडतात यावर प्रकाश टाकणारे संशोधन करणाऱ्या लिंडा बक यांच्यावरही लेखकाने लिहिले आहे.
जगदीश चंद्र बोस, हर गोविंद खोराना व कमल रणदिवे या भारतीय जीवशास्त्रज्ञांचा समावेश पुस्तकात आहे. वैद्यकीय शिक्षणाकडून नाईलाजाने निसर्गशास्त्राकडे वळलेले बोस यांनी एकीकडे विद्युतचुंबकीय लहरींवर संशोधन केले, तर दुसरीकडे वनस्पतींमध्ये विद्युत संदेशाच्या स्वरूपात संवेदना वहन होते याचाही शोध लावला. बोस यांच्या बहुपेडी संशोधनाचा वेध लेखक घेतो. स्तनांच्या कर्करोगावरील उपचार वा क्षयरोगावर लस शोधून काढण्यासाठी रणदिवे यांनी केलेल्या संशोधनाचा कसा उपयोग झाला हे वाचून त्यांच्या कामगिरीची कल्पना येते.
अथक परिश्रम, गुंतागुंतीच्या संशोधनात झोकून देण्याची त्यांची वृत्ती, समस्यांवर उपाय योजून पुढे जाण्याची जिद्द हे या शास्त्रज्ञांतील समान धागे लेखकाने नमूद केले आहेत. आवश्यक तेथे रेखाचित्रे दिल्याने विषय समजणे सोपे होते. क्लिष्टता शक्य तितकी टाळून विषय सोपा करून कथन करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. पुस्तकाला डॉ. कमलादेवी आवटे यांची प्रस्तावना लाभली आहे. अजय महाडिक यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक.
दहा जागतिक दर्जाचे निवडक जीवशास्त्रज्ञ
लेखक ः डॉ. सुनील विभुते
प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स, नवी मुंबई
पृष्ठे : 85, n मूल्य : 200 रुपये




























































