
खेड तालुक्यातील तिसंगी येथील जंगलमय भागात धाड टाकून खेड पोलिसांनी गावठी दारूची भट्टी उद्धवस्त केली. यावेळी पोलिसांनी लाखो रुपये किंमतीचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य नष्ट केले. पोलिसांनी या प्रकरणी देवानंद उर्फ भाऊ महिपत भोसले (रा. तिसगी, पिंपळवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खेड तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीतील जंगलमय भागाात मोठ्या प्रमाणात गावठी दारु गाळली जात असल्याची माहिती खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुजीत गडदे यांनी गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तिसंगीच्या जंगलात धाड टाकली. घनदाट जंगल, काळोख आणि पाऊस यामुळे ज्या ठिकाणी दारू गाळली जात होती. त्या ठिकाणी पोहचण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.
काहीही झाले तरी गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करायचीच हा निर्धार असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे व त्यांचे सहकारी यांनी ती भट्टी शोधून काढलीच. आपल्या भट्टीकडे पोलीस येत असल्याची कुणकुण गावठी दारू गाळणाऱ्या भोसले याला लागताच त्याने तिथून पळ काढला. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल तसेच अन्य साहित्य असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तो नष्ट केला.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडलेल्या या मोहिमेत खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे, पोलीस उपनिरिक्षक योगेश मोरे, पोलीस कर्मचारी शिंदे, कडू, संकेत गुरव, झेंडे, पवार, कलिंगणे, जाधव, कोटकर, पेढांमकार सहभागी झाले होते.


























































