अंबड तालुक्यातील वाळूसाठ्यांवर छापे; कोट्यवधींचा वाळूसाठा जप्त

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळुसाठ्यांवर छापे मारुन दीड हजार ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. या वाळू साठ्याच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांनी भेट दिली आहे. अंबड घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू माफीयांचा धुमाकूळ सुरू असून अवैध साठे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. कारवाई व पंचनामा करण्यासाठी पथके येतात. मात्र, वाळूमाफीयांना आवर बसलेला नसल्यामुळे पावसाळी अधिवेशनात वाळूतस्करीचा तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर 20 जून रोजी विभागीय आयुक्त आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गोंदी, पाथरवाला, कुरण येथे पथकाने व्हीडीओ शुटिंग करुन पाहणी केली होती. त्यादरम्यान गोंदी,पाथरवाला येथे एक हजार ब्रास अवैध वाळूसाठे आढळून आले होते.

हे पथक तालुक्याच्या हद्दीबाहेर जाताच पुन्हा वाळुमाफीयांचा सुळसुळाट सुरू झाल्याने मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी याप्रकरणी लक्ष केंद्रित करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक नेमून वाळुसाठे व यंत्रसामुग्री असा जवळपास कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सावळे यांच्यासह मोठ्या फौजफाट्यासह गोदावरी नदीच्या काठावरील अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील कोट्यवधीच्या वाळूसाठ्यावर मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून कारवाई सुरू केली आहे. अद्यापही छापेमारी सुरुच आहे. कुरण आणि पाथरवाला येथे उपसलेल्या वाळूचे दोन-दोन किमी एवढ्या लांबीचे डोंगर असल्यामुळे तसेच ते मोजण्यासाठी संबधित साठे मोजणारे तंत्र नसल्याने त्याची मोजमाप करणे पोलीस आणि महसूल यंत्रणेला अवघड झाले आहे. त्यामुळे या वाळूसाठ्याचे मोजमाप आणि पाहणी करण्यासाठी संभाजीनगर येथून खास ड्रोन कॅमेरा मागविण्यात आला असून ड्रोन कॅमेऱ्याव्दारे पाहणी करून साठे मोजणी सुरू आहे. मंगरूळ येथे गोदा नदीत वाळू उपसा करताना 2 पोकलँन आणि तीन हायवा ट्रक, अशी 2 कोटी 10 लाखाची यांत्रिक सामुग्री पकडण्यात आली आहे.

वाळूचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचे मोजमाप करणे सुरू असून आकडेवारी यायला वेळ लागणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेद्रसिंह गौर यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेले साठे जप्त करून ताब्यात घेणार का पात्रातच विसर्जित करणार हे मात्र अजून समजले नाही. कुरण पाथरवाला येथे सापडलेले वाळूसाठे पात्राबाहेरील असून महसूल विभागाने जप्त अगोदरच करण्यात आले असल्याचे यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी यावेळी सांगितले.