रायगडचे संवर्धन खरोखरच ‘शिवकालीन’, तीन महिन्यांपासून रोपवे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

ऐतिहासिक किल्ले रायगडच्या उभारणीच्या काळात दगडांपासून रेती, चुना असे सर्व सामान गाढवांवर लादून आणि मजुरांच्या मदतीने गडावर चढवले होते. कामाच्या देखभालीवरील मावळेही पायी गड सर करीत होते. त्याचीच पुनरावृत्ती सध्या रायगडाच्या संवर्धनाच्या कामात होताना दिसते. गडाचा रोप वे दोन महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही मजूर आणि अधिकारी दररोज पायी गडावर जातात. गाढवं आणि मजुरांमार्फत सामान गडावर नेऊन संवर्धनाचे काम अव्याहत सुरू आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने किल्ले रायगडचे जतन व संवर्धन सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 606 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. किल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत तर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी या प्राधिकरणाच्या सदस्य सचिव आहेत. 2018 पासून रायगडाच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. शिवकाळात ज्या पद्धतीने रायगडाची उभारणी केली त्याच पारंपारिक पद्धतीने जतन संवर्धन व डागडुगीचे काम सुरू आहे. गडाच्या पायऱयांच्या मार्गाचे काम पूर्ण झाले. आतापर्यंत चित्त दरवाजा ते महादरवाजापर्यंतच्या पायरी मार्गाचे 80 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. गडावर 84 तलाव व पाण्याची टाकी आहेत. त्यातील 23 टाक्यांमधील गाळ काढून पावसाच्या स्वच्छ पाण्यानी तुडूंब भरले आहेत, असे गडाचे वास्तू संवर्धक वरुण भांबरे सांगतात.

गडाच्या संवर्धनाचे जोरात काम सुरू असताना मार्चमध्ये लॉकडाऊन झाला. दोन महिने काम ठप्प होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर काम पुन्हा सुरू झाले. कामाला वेग येण्यास सुरुवात झाली. पण नेमका गडाच्या पायथ्याजवळच्या हिरकणी वाडीतील रोप वेच्या मालकीच्या जागेवरून कोर्टात वाद सुरू झाला. त्यातून रोप वे व सामान वाहून नेणारा रोप वेही बंद झाला. या कामात पूर्वीही बराचसा कच्चा माल गाढवांवरून व मजुरांनी गडावर नेला होता. आता मालवाहतुकीचा रोप वे बंद असल्याने गाढवांवरून सामान नेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. प्रवासी रोप वेही बंद असल्याने दीडशे मजूर व प्राधिकरणाचे कर्मचारी दररोज सकाळी सक्वा तास चालत गडावर जातात. सध्या गडावर वास्तव्यास परवानगी नसल्याने कामानंतर पुन्हा संध्याकाळी गड पायउतार होतात. सर्वच जण सेवेचे ठायी तत्पर असल्याने संवर्धनाच्या कामात खंड पडलेला नाही.