
कोरोनाची नाकाबंदी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनने रायगडकरांचा प्रचंड गोंधळ उडवून दिला आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 10 दिवसांचा तर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 12 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सक्तीने बंद ठेवा, पण सामानाची होम डिलिव्हरी करा, असे अजबगजब आदेश प्रशासनाने काढलेल्या अध्यादेशात असल्याने लॉकडाऊनच्या ‘बंदोबस्तात’ जाण्याआधीच लाखो रायगडवासी बुचकळ्यात पडले आहेत.
रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नऊ हजार पार गेला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी व संबंधित महत्त्वाच्या अधिका-यांची बैठक झाली. त्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 24 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर 14 जुलैच्या रात्री जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अध्यादेश काढत हा लॉकडाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल असे स्पष्टपणे नमूद केले. एकाच बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय झाला असताना पालकमंत्री 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीरपणे सांगतात, तर जिल्हाधिकारी आणखी दोन दिवस वाढवून 12 दिवसांच्या लॉकडाऊनचा अध्यादेश काढतात. नेमके आदेश कुणाचे पाळायचे असा सवाल विचारला जात आहे.
दुकाने बंद ठेवायची मग होम डिलिव्हरी कशी करणार?
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 15 ते 24 जुलैपर्यंत जिल्ह्यात मेडिकल स्टोअर्स वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही पूर्णपणे बंद असतील असे जाहीर केले. मात्र त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अध्यादेशात 26 जुलैपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये किराणा, फळे, भाजी, चिकन, मटण, मासे, अंडी, घरदुरुस्तीचे सामान याच्याबरोबरच दारूचा स्टॉक सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ‘होम डिलिव्हरी’ने मागवता येईल असे नमूद केले आहे. पालकमंत्र्यांच्या सक्त आदेशानुसार मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद ठेवायची असतील तर वस्तूंची होम डिलिव्हरी कशी करणार? त्यासाठी दुकाने उघडावी लागतीलच ना, असा सवाल रायगडच्या 15 तालुक्यातील लाखो दुकानदारांनी केला आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 24 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर 14 जुलैच्या रात्री जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अध्यादेश काढत हा लॉकडाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल असे स्पष्टपणे नमूद केले.