
रायगडात गेल्या काही वर्षांत औद्योगिकीकरण झपाट्याने वाढल्याने कृषी क्षेत्र कमी झाले आहे. याचा फटका गोधनाला बसला असून दुग्ध उत्पादन कमालीचे घटले आहे. जिल्ह्यात दररोज 8 लाख 30 हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र जिल्ह्यात फक्त 3 लाख 38 हजार लिटर दूध उत्पादित होत असल्याने दररोज सुमारे 5 लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांसह गुजरात राज्यातून आयात करावे लागत आहे.
रायगड जिल्ह्याला एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढले आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने मुबलक – पौष्टिक हिरवा चारा कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटत चालला आहे.
2 लाख 39 हजार जनावरे
जिल्ह्यामध्ये देशी गाई, संकरीत गाई आणि म्हशी अशा जनावरांची एकूण संख्या सुमारे 2 लाख 39 हजार 131 आहे. यातील 30 टक्के जनावरे दूध देणारी आहेत. या जनावरांद्वारे दररोज एकूण 3 लाख 37 हजार 977 लिटर दूध उपलब्ध होते.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढले आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने मुबलक – पौष्टिक हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटत चालला आहे. त्यातच पर्यटन व्यवसायात मोठी संधी निर्माण झाल्याने तरुणवर्ग पर्यटन व्यवसायाकडे वळला आहे. याचा मोठा फटका येथील दुग्ध व्यवसायाला बसला.
117 दुग्ध संकलन संस्था बंद
रायगड जिल्ह्यात 136 नोंदणीकृत दुग्ध संकलन करणाऱ्या सहकारी संस्था आहेत. त्यामधील फक्त 18 संस्था दुग्ध संकलन करत आहेत. तब्बल 117 संस्था बंद पडल्या आहेत. सुरू असलेल्या 18 संस्थांमध्ये प्रतिदिन 1 हजार 573 लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. सरकारी दरापेक्षा खुल्या बाजारात दुधाला चांगला भाव येत असल्याने अनेक शेतकरी बाजारातच दूध विक्री करतात. शिवाय काही खासगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरल्याने दुग्ध संकलन केंद्रात येणाऱ्या दुधाचे प्रमाण घटले आहे.





























































