आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येणार नाही

रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकणार नाही, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी मेळाव्यात बोलताना केले. महाराष्ट्राचे राजकारण सध्या स्थिर नसून कुणी कुठेही गेले तरी आपण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

नेरळ येथे झालेल्या शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात शेकापला विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी आपण नव्याने पक्ष बांधणी करणार आहोत. कार्यकर्त्यांनी खचून न जाता आत्मपरीक्षण करून पुढे जावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. ज्यांना आपण मोठे केले ते किती वेळ प्रत्यक्षात निवडणूक काळात आपल्या सोबत राहिले याचाही विचार करण्याची गरज असून पक्ष संघटना बांधण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे जयंत पाटील यांनी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.