
तालुक्यातील कोथेरी धरणावर आज सकाळी 11 च्या सुमारास जबरदस्त आगडोंब उसळला. धरणाच्या कामासाठी शिरगाव परिसरामध्ये आणलेल्या एचडीपीई प्रकारच्या पाईपला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाईपचा साठा जळून खाक झाला. धरण परिसरातही प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
कोथेरी धरण हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. जलसंपदा विभागामार्फत 2006 पासून या धरणाचे काम सुरू असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पाईपलाईन टाकण्यासाठी शिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाईप साठवून ठेवण्यात आले होते. मात्र या पाईपला आग लागली आणि बघता बघता सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महाड नगर परिषद आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
वणव्यामुळे आगीचा भडका
कोथेरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा देत अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या वणव्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली. हे धरण 33.92 मीटर उंच असून याची पाणीसाठा क्षमता 8.22 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणामुळे कोथेरी, कोल, शिरगाव, चोचिंदे, मुठवली, दादली, किंजळघर, वडवली, कोंडीवते, राजेवाडी, कांबळे या 11 गावांना सिंचनाचा लाभ मिळेल. तसेच महाड शहरासाठी पाणी राखीव ठेवणात येणार आहे.

























































