मुख्यमंत्र्यांची पेयजल योजना लटकली; अलिबागच्या कोळघर, तळाशेत, ताडवागळेत पाणीटंचाईचे चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल योजना लटकली आहे. कोट्यवधी रुपयांची योजना राबवूनदेखील गावाला पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील कोळघर, तळाशेत आणि ताडवागळे गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांना त्यांच्या दालनातच घेराव घातला आणि पाणी मिळत नसल्याबद्दल जाब विचारला.

गावासाठी जी जुनी पाणीपुरवठा योजना आहे त्या योजनेच्या जल वाहिनीवर ठिकठिकाणी गळती लागली आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी झिरपत असून यामुळे कडधान्य पिकांचे नुकसान होत आहे. ही गळती तातडीने थांबवावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. यानंतर गळती थांबली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या योजनेच्या जलवाहिनीवर ठिकठिकाणी बेकायदा नळ कनेक्शन घेण्यात आले. आहेत ते तातडीने काढून टाका अशी मागणीदेखील ग्रामस्थांनी यावेळी केली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यापुढे कार्यकारी अभियंता सरवदे यांना नमते घ्यावे लागले. या योजनेच्या कामांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

काम अर्धवट तरी ठेकेदाराला पैसे दिले

कोळघर, तळाशेत आणि ताडवागळे या गावांसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे, परंतु हे काम रखडले आहे. योजनेचे काम अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नाही. 1 कोटी 98 लाख रुपये किमतीच्या या कामाचे 1 कोटी 94 लाख रुपये जिल्हा परिषदेने ठेकेदाराला अदा केले आहेत. काम अर्धवट असताना ठेकेदाराला रक्कम कशी अदा केली, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला, परंतु अधिकाऱ्यांकडे यावर उत्तरच नव्हते.