
देशात दहशतवादी घुसल्याचे वृत्त पसरले की, सर्वात आधी भारतीय रेल्वे देशभरातील रेल्वेस्थाकनांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करते. मात्र,आता भारतीय रेल्वेने स्वतःची कमांडो फोर्स तयार केली आहे. या कमांडो फोर्समधील जवान दहशतवाद्यांशी लढतील. तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षणही करतील.
कमांडोज फॉर रेल्वे सेफ्टी असे या कमांडो फोर्सला नाव दिले गेले असून खास रेल्वेचे संरक्षण करण्यासाठी ही फोर्स तयार करण्यात आली आहे. या फोर्सची पहिली तुकडी बुधवारी तैनात करण्यात आली. ही पहिली तुकडी छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागातील रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. कमांडोज फॉर रेल्वे सेफ्टीच्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी हरयाणातील जगाधरी शहरात अत्याधुनिक तसेच सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे केंद्र उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
1200 कमांडोंचे पथक
या सुरक्षा दलात महिला आणि पुरुष मिळून 1200 कमांडो आहेत. पहिल्या तुकडीने मॉकड्रीलही केले. एका बोगीत काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दहशतवाद्यांनी बंधक बनवल्याची माहिती या सुरक्षा दलातील जवानांना देण्यात आली. त्यानंतर केवळ 12 मिनिटांत जवानांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सोडवले.



























































