
सामना प्रतिनिधी । नागपूर
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा (अप्रेंटीसशिप) संशयास्पद मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह बेलीशॉप, मोतीबाग येथील फुटबॉल मैदानालगतच्या स्विमींग टँकमध्ये आढळला. या घटनेमुळे शंका कुशंकांना वेग आला आहे.
घनश्याम सुनील हिंगणे (२१) रा. आंबेलोहर, ता. जामनेर जि. जळगाव असे मृताचे नाव आहे. रेल्वेत प्रशिक्षणार्थी म्हणून फिटर ट्रेडचे ८ तरुण १३ एप्रिलपासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता रेल्वेच्या अनुभवी कर्मचारयासह चार प्रशिक्षणार्थी उमेदवार मिळून सात- आठ जण मोतीबाग रेल्वे कॉलनीतील इमारत क्रमांक १५४ च्या छतावरील पाईप दुरूस्तीचे काम करित होते. दहा ते सव्वा दहाच्या सुमारास वरिष्ठ सहकारी कर्मचारयाला पाणी पिण्यास जातो असे सांगून तो निघाला. दुपारी १२. ३० च्या सुमारास घनश्याम मृतावस्थेत स्विमींग टँकमध्ये पडून असल्याची माहिती मिळाली. सर्वांनीच स्विमींग टँककडे धाव घेतली. तोवर मृतदेह उचलून रेल्वे रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच संतप्त रेल्वेकर्मचारी रेल्वे रूग्णालयासमोर गोळा झाल्याने तणाव वाढला. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर आणि मोतीबागच्या जवानांना रूग्णालयात पाचारण करण्यात आले. तोवर कुटुंबियांना घटनेची सूचना देण्यात आली असून ते नागपूरला येण्यासाठी निघाले आहेत.
अर्धाफुट पाण्यात मृत्यू झालाच कसा?
घनश्यामचा मृतदेह आढळलेले स्विमींग टँक बंद आहे. त्यात केवळ सहा इंचच पाणी होते. यानंतरही त्याचा मृत्यू झाला कसा? कोणतेही काम नसताना तो स्विमींग टँकडे गेलाच कशाला? इतक्या कमी पाण्यात त्याचा मृत्यू झालाच कसा आदी उनुत्तरीत प्रश्नांमुळे शंका कुशंका व्यक्त के ल्या जात आहेत.
स्वप्न भंगले
घनश्यामच्या मोठया बहिणीचे लग्न झाले. त्यानंतरच तो घरातील मोठा असल्याने कुटूंबाची जबाबदारीचा भार त्याच्याच खाद्यांवर होता. रेल्वेत प्रशिक्षणार्थी असल्याने कुटूंबियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र घनश्याम दुदैवी मृत्यूने कुटूबियांचे स्वप्न भंगले असून त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे.






























































