
रेल्वेत इंजिनीयर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीश चौरसिया (38) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते अंधेरीत कार्यरत होते. ही दुर्दैवी घटना वसई येथे शनिवारी मध्यरात्री घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांचे आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
विरार पश्चिमेच्या राम निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नितीश चौरसिया हे राहात होते. शनिवारी मध्यरात्री त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. नितीश यांचा भाचा राजेंद्र याला घटनेची माहिती मिळताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नितीश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. राजेंद्रने तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. नितीश यांचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नितीश हे काही गोळ्यांचे सेवन करीत असल्याचे राजेंद्र याने पोलिसांना सांगितले. ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध विरार पोलीस घेत आहे.