
कोरोनापूर्व काळात उपनगरीय लोकलमधून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करीत होते. गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने लोकल प्रवासासाठी लसीकरणाची गरज राहिलेली नाही. त्यामुळे लोकलची गर्दी पुन्हा पहिल्यासारखी वाढेल अशी अपेक्षा होती; परंतु त्याप्रमाणे गर्दी काही वाढली नसल्याचे उघड झाले आहे. कोरोनापूर्व काळात लोकलने दररोज तब्बल 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करायचे; परंतु सध्या सर्व निर्बंध उठवूनही दररोज 62 लाख प्रवासीच प्रवास करत असल्याचे आकडेवारी सांगत असल्याने उर्वरित प्रवासी गेले कुठे, असा सवाल निर्माण झाला आहे.
टॅक्सीचालक गावी गेले
मुंबईत सुमारे 48 हजार काळी-पिवळी टॅक्सीचालक आहेत. सध्या 18 हजार कर्मचारी रस्त्यावर डय़ुटी बजावत आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लग्नाचा मोसम असतो. त्यामुळे कोरोनाकाळात आपापल्या गावी गेलेले टॅक्सीचालक अजूनही मुंबईत परतलेले नाहीत. कारण दोन ते तीन महिन्यांसाठी पुन्हा मुंबई येऊन जाण्याचा त्रास, रेल्वे तिकिटांचा तुटवडा आदी त्रास टाळण्यासाठी ते आता थेट लग्नाचा मोसम संपल्यावरच मुंबईत परततील असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वॉड्रोस यांनी स्पष्ट केले.
57 लाख मजुरांचे स्थलांतर’
कोरोना साथीच्या पहिल्या लाटेच्या वेळी 1 मे ते 2 जून 2020 यादरम्यान रेल्वेने विविध राज्यांतून 4,155 श्रमिक स्पेशल ट्रेन चालविल्या असून त्याद्वारे 57 लाख मजूर त्यांच्या गावी स्थलांतरित झाले होते. महाराष्ट्रातून 802 श्रमिक स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्याची आकडेवारी सांगते. तसेच एसटी महामंडळानेही मजुरांची त्यांच्या त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठवणूक केली होती.
वर्क फ्रॉम होमचाही परिणाम
आयटीसह अनेक पंपन्यांच्या कर्मचाऱयांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळेही प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. लोकलच्या प्रवाशांची संख्या आता पूर्वीप्रमाणे वाढण्याची शक्यताही कमीच असल्याचे वाहतूकतज्ञ विवेक पै यांनी सांगितले.
दररोज 3185 फेऱया
सध्या मध्य रेल्वेवर दररोज 1810 तर पश्चिम रेल्वेवर 1375 लोकल फेऱया चालविण्यात येत आहेत. अशा एकूण 3185 लोकल फेऱया चालविण्यात येत आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरच्या गर्दीत कोरोनापूर्व काळाप्रमाणे वाढ झाली असली तरी नॉन-पिकअवरची गर्दी थोडी कमी झाल्याचे म्हटले जात आहे.



























































