
लांबपल्ल्याच्या सर्वच श्रेणीच्या गाड्यांमध्ये सरसकट भाडेवाढ केल्यानंतर रात्री बाराच्या ठोक्याला रेल्वेच्या तिकीट देणार्या यंत्रणेत वाढलेल्या भाड्यानुसार बदल करताना दिरंगाई झाल्याने रेल्वेला प्रचंड फटका बसला. पश्चिम रेल्वेवर तर पुन्हा जुन्या पद्धतीने हाताने लिहून वाढलेल्या दराची तिकिटे देण्यात आली. तसेच रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट विक्री पाहणार्या आयआरसीटीसीच्या यंत्रणेला फटका बसून रात्री इंटरनेटवर तिकीट बुक करणार्यांचे वांदे झाल्याने रेल्वेला नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा आर्थिक फटका बसल्याचे म्हटले जात आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच रेल्वेने लांबपल्ल्याच्या तिकिटांच्या दरात प्रतिकिलोमीटरमागे 1 ते 4 पैसे दरवाढ केल्याने लांबचा प्रवास करणार्या प्रवाशांना नवीन वर्ष ‘बॅड न्यूज’ घेऊन आले. जितके अंतर जास्त तितकी तिकिटाच्या दरात वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला नवा भार सहन करावा लागणार आहे. त्यातच रात्री 12 च्या ठोक्याला दरवाढीनुसार रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करताना दिरंगाई झाल्याने अनेक ठिकाणी प्रवासी आरक्षण यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील संगणक बंद ठेवण्यात येऊन लांबपल्ल्याची तिकिटे पुन्हा जुन्या पद्धतीने वितरित करण्याची वेळ पश्चिम रेल्वेवर आली. तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रात्री ऑनलाइन तिकिटे बुक करणार्यांना देखील या बदलाचा फटका बसला.
लोकल तिकीटधारकांनाही फटका
अनारक्षित तिकीट यंत्रणेत ‘क्रिस’द्वारे सॉफ्टवेअरमध्ये भाडय़ाचा नवा दर टाकताना काही काळ सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर आयत्यावेळी लांबपल्ल्याच्या गाडय़ांतून प्रवास करणार्या जनरल डब्याच्या प्रवाशांच्या रांगा वाढल्या. त्यांना या बिघाडाचा फटका बसला. मुंबई उपनगरीय प्रवासी भाडय़ात वाढ झाली नसली तरी संगणक बंद पडल्याने त्यांनाही तिकीट विकत घेताना अडचणी आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. उपनगरीय लोकलमध्ये पासधारकांची संख्या जास्त असल्याने त्याची तीव्रता फारशी जाणवली नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.




























































