
सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वेवर रेल्वे स्टाफने विनामास्क प्रकरणी 296 तक्रारी दाखल करीत 59 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर पालिका व रेल्वेने एकत्रित कारवाई करीत 37 हजार 188 तक्रारी दाखल करीत 32 लाख 26 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या केसेस कमी झाल्यामुळे आता लोकल प्रवासातही प्रवासी केवळ कारवाई टाळण्यासाठी हनुवटीवर मास्क लावत असून नाक उघडेच ठेवत आहेत. सकाळी पिकअवरच्या गर्दीमध्ये आता मास्क लावून नियम पाळणारे कमीच प्रवासी दिसत आहेत. तरीही काही महत्त्वाच्या स्थानकांवर तिकीट तपासणीस मास्क नसलेल्या प्रवाशांवरही कारवाई करताना दिसत आहेत. पश्चिम रेल्वेवर पालिका आणि रेल्वे या दोघांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ऑगस्ट महिन्यात विनामास्क प्रकरणी 1 हजार 816 तक्रारी दाखल होत 2 लाख 26 हजार 200 रुपयांचा दंड वसूल झाला होता. तर मध्य रेल्वेवर ऑगस्टमध्येच केवळ रेल्वेच्या पथकांनी केलेल्या कारवाईत विनामास्क प्रवाशांविरोधात 280 तक्रारी दाखल होऊन 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर रेल्वे पथकाने एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांत विनामास्क प्रवाशांवर 2,342 तक्रारी दाखल करीत 4 लाख 59 हजार 45 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर पालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त कारवाईत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत 37 हजार 188 तक्रारी दाखल होत 47 लाख 30 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


























































