
हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव मार्गिकेवरही आता एसी लोकलच्या फेऱ्या धावणार आहेत. एप्रिल महिन्यात उपनगरी रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी पहिली एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल होऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी हार्बरची सीएसएमटी-गोरेगाव मार्गिका लाखो नियमित प्रवाशांना उपयुक्त ठरत आहे. या मार्गिकेवर दररोज 100 हून अधिक लोकल फेऱ्या धावत आहेत. येथील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन काही नॉन-एसी लोकल फेऱ्यांचे एसी फेऱ्यांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहोत. तथापि, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने संबंधित प्रस्तावाला संयुक्तपणे मंजुरी दिली तर 1 एप्रिलपासून नव्या एसी लोकल वेळापत्रकात सीएसएमटी-गोरेगाव एसी लोकल फेऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. सध्या सीएसएमटीहून वाशी आणि पनवेलला जाणाऱ्या दर दोन किंवा तीन गाडय़ानंतर वांद्रे किंवा गोरेगावला जाणारी गाडी असते. सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव मार्गावर दररोज 3 लाख ते 5 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसी लोकलचा एक रेक दाखल केला जाणार आहे. यामुळे सीएसएमटी ते गोरेगाव मार्गिकेवर 12 ते 14 सेवा चालवल्या जाऊ शकतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
साध्या लोकलच्या सेवेवर परिणाम
रेल्वे प्रशासन सर्वच मार्गांवर एसी लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन करीत आहे. या फेऱ्यांसाठी नॉन-एसी म्हणजेच साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे महागडे तिकीट काढून आरामदायी प्रवास करणाऱ्यांची सोय होईल. मात्र साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल वाढतील, त्याचे काय? अशी संतप्त प्रतिक्रिया हार्बर मार्गावरील नियमित प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. एसी लोकलमुळे साध्या लोकलचे वेळापत्रक कोलमडण्याची चिंता प्रवाशांना सतावत आहे.



























































