
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
पावसाळा सुरू झाल्यापासून संभाजीनगरात सोमवारी पहिल्यांदाच झड अनुभवाला आली. आषाढसरींच्या भीजपावसाने संपूर्ण शहर आणि परिसर चिंब भिजून गेला. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ८ वाजेपर्यंत ३७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर कोसळणाऱया संततधार पावसामुळे नागरिक सुखावले, शेतकरी आनंदला. तशा पडझडीच्याही काही किरकोळ घटना घडल्या. दोन झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशामक दलाने तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली.
सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बसस्थानक रोडवरील सेवायोजन कार्यालयासमेर असलेले जुने झाड उन्मळून पडले. रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. घटना कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत झाड हटवण्यासाठी प्रयत्न केले. तीन तासानंतर झाड हटवण्यात जवानांना यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. श्रेयनगरात झाडाची फांदी तुटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जवानांनी घटनास्थळी पोहोचून फांदी हटवली. दोन्ही घटनांत सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. शिवाजीनगर भागात मयूर टेरेस अपार्टमेंटजवळील उघडय़ा नाल्यात बैल पडला होता. घटना कळताच अग्निशमन दलाचे बाकडे, भगत आणि वेलदोडे आदी कर्मचाऱयांनी धाव घेत बैलाला सुखरूप बाहेर काढले.


























































