
परतीचा पाऊस लांबल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या संकटाने हिरावला आहे. काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, सोयाबीन व भुईमूग या पिकांना या पावसाचा तडाखा बसला आहे. कांदा शेतातच सडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भीषण दुष्काळाने गतवर्षी तालुक्यातील बहुतांश भाग चांगलाच होरपळून निघाला होता. त्यातच शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यावर्षी चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, टोमॅटो, कोबी, बाजरी, मका आदी पिकांची लागवड केली होती. ही पिके काढणीला आली असतानाच पावसाने जोरदार तडाखा देत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे शेतात उभ्या असलेली पिके सडून गेली आहेत. काही ठिकाणी बाजरी, मक्याच्या कणसांना मोड फुटले आहेत. अनेक भागात शेतात पाणी असल्याने पीक गोळा करून सुरक्षित ठिकाणी ठेवणेही शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याने दिवाळीच्या तोंडावर बळीराजा संकटात सापडला आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पालक, मेथी, शेपू या भाज्यांसोबतच वांगी, कारले, वालवड या भाजीपाला पिकांवरही सततच्या पावसाने अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिकेही संकटात सापडली आहेत.





























































