
सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यभरात थैमान घातलेला पाऊस आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मुंबईसह सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रायगड, पालघर, ठाण्यासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्यांनाही याचा फटका बसला आहे. कंदील-फटाके भिजले असून रांगोळय़ाही पुसल्या गेल्या. फटाक्यांऐवजी पावसाचीच ‘आतषबाजी’ सुरू राहिल्याने उत्सवाच्या उत्साहावर पाणी पडले आहे. त्यामुळे मुंबईकरांमधून नाराजी व्यक्त केली आहे.
मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱयांच्या पिकांसह जमिनीही खरवडून गेल्या आहेत, मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे मान्सून परतल्याची घोषणाही हवामान खात्याकडून करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याचे आता स्पष्ट झाले. मुंबईतही आज सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. याचा परिणाम रेल्वे वेळापत्रकावर झाला. ऐन गर्दीच्या वेळी ट्रेन रखडल्याने प्लॅटफॉमवर प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱया मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.
चार दिवस पावसाचा इशारा
देशभरात नैऋत्य मान्सून वाऱयांनी माघार घेतली असली तरी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे ठाकले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
फटाक्यांऐवजी ढगांचा गडगडाट
ऐन लक्ष्मी पूजनादिवशी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने फटाके पह्डण्याला आळा बसला. त्यामुळे फटाक्यांऐवजी ढगांचाच गडगडाट सुरू राहिला. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.