कोपरगावात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, दोन तासात 4 इंच पावसाची नोंद

कोपरगावात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दोन तासात परिसरात 98 मिमी (4 इंच) पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान खात्याचे प्रभारी निरीक्षक चेतन पऱ्हे यांनी दिली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दुपारी 3.30 वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे सव्वा दोन तास झालेल्या दमदार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी गारवा अनुभवला.

कोपरगावात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास सुरूवातीस सोसाट्याचा वारा आला. त्यानंतर काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटात दमदार पावसाला सुरुवात झाली. कोपरगाव शहरासह तालुक्यातील शिंगणापूर, संजीवनी कारखाना, संवत्सर, अंचलगाव, कोपरगाव रेल्वे स्थानक आदी परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. दोन तासात 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साठले होते. सखल भागात यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते तर काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडीत झाल्याने जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाल्याचे दिसून आले. मात्र, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या