परतीच्या पावसाचा मुंबईत ‘गडगडात’

462

गेले काही दिवस ‘ऑक्टोबर हीट’चा रखरखाट सहन केलेल्या मुंबईत बुधवारी सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. दक्षिण मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. त्यामुळे कामावरून घरी परतणार्‍या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली.

मुंबई शहर व उपनगरात बुधवारी सायंकाळी देवींच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. याच दरम्यान पावसाने कुठे रिमझिम, तर कुठे विजांच्या कडकडाटासह मुसळधार हजेरी लावून देवीभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही या पावसाचा फटका बसला. पाऊस अखेर गेला, असे गृहीत धरत छत्री घरी ठेवून कामावर आलेल्या मुंबईकरांची प्रचंड धावपळ उडाली. बुधवारी सकाळी साडेआठ ते रात्री आठ वाजेपर्यंत कुलाब्यात 7.0 मि.मी. तर सांताक्रुझमध्ये 0.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद वेधशाळेने केली.

वेधशाळा म्हणते, आणखी दोन दिवस बरसेल

मुंबईत पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पुढील काही दिवसांतच तो शहरातून काढता पाय घेईल, असे कुलाबा वेधशाळेतील अधिकार्‍यांनी सांगितले. पुढील आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या