संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला

497

कोरोनाचे देशभरात थैमान घातले असतानाच नागरिक वाढत्या उकाड्याने त्रस्त झाले होते. कोरोनाच्या भीतीमुळे एसीचा वापरही करता येत नव्हता. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. संगमेश्वर तालुक्यात रविवारी संध्याकाळी मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. संगमेश्वर तालुक्यात एक तास मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दोन दिवस तालुक्यात उकाड्यात वाढ झाली होती. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचे आगमन होत नव्हते. मात्र, रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि चार वाजता ढगांचा कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पाऊस कोसळत होता. अचानक आलेल्या या पावसाने देवरुख बाजारपेठेत नागरीकांची व व्यापाऱ्यांची धावपळ झाली. रविवारी देवरुख बाजारपेठेत सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही गर्दी दुपारनंतर ओसरली होती. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली.

काही भागात शेतकर्‍यांनी पेरण्या उरकुन घेतल्या होत्या त्यांना या पावसाचा चांगला फायदा होणार आहे. लॉकडाउनच्या काळात शेतकरी वर्गाने शेतीची कामे आटपुन घेतली होती. भाजावळ करुन जमीन नांगरुन पेराही केला होता. अचानक कोसळलेल्या पावसाने वीज गायब झाली होती. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. तेथील माती रस्त्यावर आल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. सुमारे एक तास पाऊस बरसत होता. तर पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या