दुसऱ्या टी-20 लढतीवरही वादळी पावसाचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे खालावलेला हवेचा दर्जा सर्वांसाठी चिंतेचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच पहिल्या टी-20 सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी सतत करण्यात येत होती. बीसीसीआयने सामन्याचे ठिकाण बदलण्यास नकार दिल्यानंतर ही लढत  वेळापत्रकानुसार पार पडली. यानंतर दुसऱ्या टी-20 लढतीवरही वादळी पावसाचे काळे ढग तयार झाले आहेत. निसर्ग काही हिंदुस्थान आणि बांगलादेश संघांतील क्रिकेट मालिकेची पाठ सोडायला तयार नाहीय.

गुरुवारी 7 नोव्हेंबरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ राजकोटच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन हात करणार आहे. मात्र याच कालावधीत अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे  चक्रीवादळ येणार असल्यामुळे लढतीच्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिव–दमण, वेरावल परिसरात या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असल्यामुळे या काळात गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदुस्थानी  हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

…तर दुसऱ्या टी-20 वर पावसाचे पाणी

6 आणि 7 नोव्हेंबर हे दोन दिवस गुजरातमधील किनारपट्टी भागासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या दोन दिवसांमध्ये किनारपट्टीलगतच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समालोचक हर्षा भोगले यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास दुसरा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत हिंदुस्थानी संघ पुन्हा विजयी ट्रकवर परतणार का, याकडे हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे.