उरणमध्ये पावसाचा कहर, चिरनेर सह अनेक गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उरण तालुक्यातील अनेक गावां पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिरनेरसह नवघर, भेंडखळ, पागोटे, कुंडेगाव, फुंडे, जसखार, सोनार, जासई, रांजणपाडा, पाले आणि पाणदिवे आदी गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अनेकांच्या घरांमध्ये दोन-दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते.

उरण तालुक्यात रविवारी पहाटे पर्यंत 183 मीमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पडलेल्या पावसामुळे राज्य महामार्ग क्र.104 वर कंठवली येथे पाणी भरल्यामुळे सकाळी या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तर दिघाटी केळवणे रस्त्यावर देखील पाणी साचल्याने वाहतूक बंद पडली होती. पावसाचा सर्वाधिक तडाखा चिरनेर गावाला बसला. चिरनेर गावातील सुमारे 200 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसाने सखल आणि नाल्याच्या कडेला असलेल्या नागरिकांनी रात्र जागून काढली. कोप्रोली आणि सोनारी येथे घराची भिंत पडल्याची घटना घडली आहे.

उरण तालुक्यातील नवघर गावात 26, कुंडेगाव येथे 32, पागोटे येथे 12, पाले येथे 17, करळ, सावरखार, सोनार येथे 21, जासई, रांजणपाडा, कळंबुसरे, पाणदिवे या गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक गावात फिरून तलाठी, ग्रामसेवक पंचनामे करत असल्याचे उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे यांनी सांगितले. मुसळधार पावसाचा तडाखा पीरवाडी समुद्र किनाऱ्याला देखील बसला असून अनेक ठिकाणी नारळाची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धुप झाली आहे.

उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी उध्दभविणाऱ्या पुर परिस्थितीचा आढावा घेऊन पुरग्रस्तांच्या नुकसानी संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांना दिले आहेत.