50 वर्षात महाबळेश्वरने पहिल्यांदाच अनुभवला कोरडा पावसाळा

1655

50 वर्षात कधीही घडले नव्हते ते यंदा महाबळेश्वरमध्ये घडले आहे. इथे पावसाच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात 5 दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. जून आणि जुलै महिन्यात साताऱ्यातील या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी 1922.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 40 टक्के कमी असल्याचं दिसून आलं आहे.

जून आणि जुलै महिन्यामध्ये 2 हजार मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद यापूर्वी 1970 साली करण्यात आली होती. महाबळेश्वरच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे इथे चांगला पाऊस पडतो. इथे वर्षभरात 5710 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. यातील बहुतांश पाऊस हा जून ते सप्टेंबरमध्ये पडत असतो. या काळात महाबळेश्वरमध्ये पडणारा पाऊस हा 5530.1 मिलीमीटर इतका असतो. यामुळे पावसाळ्यातही महाबळेश्वर पर्यटकांनी फुललेले असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे इथे पर्यटक नाहीत, मात्र चिंतेची बाब ही आहे की इथे पाऊसही नाहीये.

World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

2018 आणि 2019 साली ऑगस्टच्या मध्यापर्यंत महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली होती. इथे हिंदुस्थानातील सर्वात जास्त पावसाची नोंद होत असलेल्या चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस झाला होता. जून महिन्यात इथे सरासरी 897 मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा तो फक्त 716 मिलीमीटर इतका झाला आहे. जुलै महिन्यात या पर्यटनस्थळी 3128 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो, मात्र यंदा जुलै महिन्यात फक्त 1206.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ जे.आर.कुलकर्णी यांनी इंडीयन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की पावसाचे ढग वाहून आणणारे वारे पश्चिम घाट पार करण्याइतक्या ताकदीचे नव्हते. यामुळे हा परीसर पावसाने व्यापला नव्हता.

अतिवृष्टीमुळे महापालिका आयुक्तांची विविध ठिकाणांना भेट; परिस्थितीची पाहणी

31 जुलैपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आकड्यांवर नजर टाकल्यास सातारा जिल्ह्यामध्येही पावसाने अद्याप सरासरी गाठली नसल्याचे दिसते आहे. इथे सरासरीपेक्षा 28 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामप्रमाणेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याचे दिसते आहे. मराठवाड्यावर मात्र यंदा पाऊस मेहेरबान झाल्याचे दिसत असून तिथल्या बहुतांश तालुक्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या