
सामना ऑनलाईन, नगर
तब्बल ३ आठवड्याच्या विश्रांती नंतर मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी राहुरीत पावसाचे दमदार आगमन झाले आहे. हा पाऊस खरीपाच्या पिकांना दिलासा देणारा ठरणार आहे.मृग नक्षत्र सुरू होऊन ही पाऊस न पडल्याने मुळा धरणाच्या राहुरी,नेवासा,पाथर्डी,शेवगाव या लाभ क्षेञातील शेतकरी तसेच धरणावर अवलंबून असलेला शेतकरी घाबरला होता. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे हा शेतकरी थोडासा सुखावला आहे.
१ जूनला बिगर मोसमी पावसाने राहुरी तालुक्यात अवघी तासभर हजेरी लावली होती.पावसाच्या भरवशावर काही भागात कापसाची पेरणी करण्यात आली होती तर काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागती झाल्या होत्या. माञ पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. २१ जूनच्या रात्री ९ वाजता राहुरी तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार २२ जून पासुन आर्द्रा नक्षञाला सुरूवात होत आहे. पुढील आठवडाभरात समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



























































