
मराठवाड्यावर कायम रुसवा धरणाऱ्या पावसाने यंदा मात्र चांगलीच मेहेरबानी केली आहे. मराठवाड्यात मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने तीन दिवसातच 119 टक्क्यांचा पल्ला गाठला. लातूर, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, बीड, संभाजीनगरमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने आठही जिल्ह्यात शेतीकामांना वेग आला आहे.
यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला होणार असे भाकीत हवामान खात्याने केले होते. हवामान खात्याचे भाकीत खरे ठरवत मान्सूनचे मराठवाड्यात वेळेवर आगमन झाले. सुरुवातीच्या काळातच मान्सूनने मराठवाड्यात सर्वदूर हजेरी लावली. तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील नदी-नाले खळाळून वाहू लागले आहेत. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड, हिंगोलीत सोमवारी संध्याकाळी जबरदस्त पाऊस झाला. हिंगोलीत 532 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर जिल्ह्यातही सोमवारी पावसाने चांगली हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड रस्त्यावर पावसामुळे तारा तुटल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. धाराशिव जिल्ह्यात काही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असली तरी उर्वरित भागाला अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकामांना वेग आला आहे.


























































