मुंबईकरांनो छत्री बाळगा, पुढच्या 24 तासांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढच्या 24 तासांच मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने म्हटले आहे की पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तापमान हे कमाल आणि किमान अनुक्रमे ३३°C आणि २४°C च्या आसपास असेल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, तसेच 40 ते 50 किमी वेगाने वारा वाहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातीही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.