देशात मॉन्सूनचे आगमन; काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

1032

केरळमध्ये मॉन्सून नेहमीपेक्षा 48 तास आधीच दाखल झाला आहे. आता मॉन्सून केरळमध्ये सक्रीय झाला असून त्याची आगेकूच सुरू आहे. केरळसह देशभरात काही राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या 2 तासास केरळसह दक्षिण हिंदुस्थानात महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पावसाचे आगमन झाले आहे. काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. सोमवारी दक्षिण हिंदुस्थान,मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेकडील काही राज्यात पावसाची शक्यता आहे.

देशभरात मॉन्सूनचे आगमन झाल्याने अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका झाली आहे. केरळमध्ये आगमन झालेल्या पावसाची आगेकूच सुरू असून केरळच्या काही भागात आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत, हवामान खात्याने केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात तिरुवनंतपुरम, कोल्लम,अलापूजा,कोट्टायम,एर्नाकूलम,इडुकी,मल्लाप्पूरम आणि कन्नूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागाला 3 जूनला वादळ धडकण्याची शक्यता आहे.

उत्तर हिंदुस्थानातही काही राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातही तापमानात घट होणार आहे. राजस्थानातील काही जिल्ह्यात 4 ते 6 जूनदरम्यान पावसाची शक्यता आहे. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. मात्र, 7 जूननंतर काही दिवस कोरडे हवामान राहणार आहे. राजधानी दिल्लीतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिल्लीत आठवडाभर असेच वातावरण राहणार आहे. बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पश्चिम हिमालय, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या