गेले काही दिवस प्रचंड उकाडा आणि उन्हाचा चटका सहन करणाऱया मुंबईकरांना दोन दिवसांपासून थोडा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड येथे मुसळधार पाऊस पडला. तर आज दिवसभर उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांनी सायंकाळपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. दरम्यान, मुंबईकरांच्या गरब्याच्या आनंदावर मात्र त्यामुळे पाणी फिरले.
पुढचे तीन दिवस मुंबईत असेच वातावरण राहील. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत पाऊस पडत असल्याची माहिती स्कायमेटच्या महेश पलावत यांनी दिली. दरम्यान, मुंबईत सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणावर धुरके पसरल्याचे चित्र होते. पावसाला सुरुवात झाल्यानंतर हे धुरके काहीसे विरले. मात्र बीकेसीसह अनेक ठिकाणी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसले.