
राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर 21 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात येईल.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन ते तीन दिवस चालणार आहे. अधिवेशनात आमदारांनी कमीत कमी संख्येने उपस्थित राहावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत कामकाजही निश्चित करण्यात येणार आहे असे सांगण्यात येते.
राज्यात कोरोनाच्या संकटात अनेक मंत्री आणि आमदार कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी झटत आहेत. त्यामुळे अधिवेशन आटोपशीर करण्यावर सरकारचा भर आहे. त्यातूनच अधिवेशनातील सदस्य गणपूर्तीची अट तात्पुरती शिथिल करावी, अशी विनंती सरकारच्यावतीने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींना करण्यात येणार असे समजते.























































