ठाकरे ब्रॅण्ड! महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी वज्रमूठ, धूमधडाका जल्लोष आतषबाजी आनंदोत्सव

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला तो क्षण अखेर आला. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा झाली आणि राज्यभरात एकच जल्लोष झाला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. ढोलताशा वाजले, गुलाल उधळला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगरसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला.

सकाळपासून दोन्ही पक्षांच्या शाखाशाखांमध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. युतीची घोषणा ऐकण्यासाठी सारेच आतुर झाले होते. ती ऐतिहासिक युतीची घोषणा कानी पडताच अनेकांच्या डोळय़ांत आनंदाश्रू आले. अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले. एकमेकांना आलिंगन देऊन पेढे भरवू लागले. कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह दिसत होता. शिवसेनेची मशाल आणि मनसेचे इंजिन उंचावण्यात आले.महापालिका निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, असे म्हणत कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमूठ बांधली.