मोदींनी इराणला साथ दिली नाही भविष्यात किंमत मोजावी लागेल, राज ठाकरे यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरप्रश्नी हिंदुस्थानला पाठिंबा देणाऱया इराणला हिंदुस्थानने साथ द्यायला हवी होती, अशी स्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मांडली. इराणच्या पाठीशी उभे न राहिल्याची हिंदुस्थानला भविष्यात निश्चितच किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.

मनसेचा 20 वा वर्धापन दिन आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडला. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी इराण-इस्रायल युद्धाबाबत भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले की, इराण इतकी वर्षे हिंदुस्थानला साथ देत होता. देशात येणारे बरेचसे तेल इराणमधून येते. ते आपल्याला रुपयामध्ये देतात. मात्र काही महत्त्वाच्या गोष्टी पंतप्रधानांकडून राहून गेल्या आहेत, ज्याचा फटका देशाला बसतोय. खामेनी गेल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेधाचे स्टेटमेंट काढले नाही. जो देश जम्मू-कश्मीरच्या मुद्दय़ावरून आपल्याला पाठिंबा देत आला त्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो नाही याचा त्रास आपल्याला भविष्यात निश्चितच होणार आहे, अशी सडेतोड भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायचीय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत, पण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचे कर्ज होते ते 2014 ते 2026 या काळात 11 लाख कोटी रुपयांवर गेले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यातील शहरे कोलमडून पडली आहेत. ट्रफिकची समस्या इतकी वाढतेय की, पाच-दहा वर्षांत आपण घरातच अडकून पडू की काय अशी अवस्था आहे. पिझ्झा 10 मिनिटांत येतो, पण लोकांना 10 मिनिटांत कुठे जाता येत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. शहरांना आकार-उकार काहीच उरलेला नाही. कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जात आहेत. रस्त्यावर उतरू नयेत म्हणून लोकांना मोबाईल फोनवर अडकून ठेवले आहे. लोकांनी असेच सडावे, मरावे हेच राज्यकर्त्यांना हवे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. यांनी केली.

महाराष्ट्र मेला तरी चालेल, आम्हाला कंत्राटदारांकडून पैसे पाहिजेत

सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा असे सांगताना राज ठाकरे यांनी संत परंपरा, इतिहास, कला, साहित्य, राजकारण, समाजसुधारणा क्षेत्रातील धुरिणांची यादी वाचून त्यांच्या योगदानाचीही माहिती दिली. महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय. नुसते प्रतिमांचे पूजन करतोय. महाराष्ट्र यांच्या प्रतिभांमध्ये अडकेल तेव्हाच महाराष्ट्राचे भले होईल. पण कुणालाच काही पडलेले नाही. महाराष्ट्र मेला तरी चालेल, आम्हाला कंत्राटदारांकडून पैसे पाहिजेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱयांवर निशाणा साधला.

– ‘महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा’ ही वेबसाईट आजपासून मनसेने सुरू केली असून त्यावर लोक आपली सुधारणावादी मते मांडू शकणार आहेत.