उठा उठा दिवाळी आली, बिल्डरांकडून सुपारी घेण्याची वेळ झाली; शिवसेना नेते राजन विचारे यांची खरमरीत टीका

ट्रॅफिक जाम, पाणीटंचाई, रस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे घोडबंदर भागातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र त्यांच्या या प्रश्नांवर मूग गिळून बसलेले वोटचोर खासदार आता पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत बिल्डरांच्या विरोधात तक्रारी करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी केली. दिवाळीच्या तोंडावर गोल्डन गँगच्या एका म्होरक्याला बिल्डरांची तक्रार का करावीशी वाटली, असा सवाल करतानाच ‘उठा उठा.. दिवाळी आली.. बिल्डरांकडून सुपारी घेण्याची वेळ झाली’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बिल्डरांविरोधात पालिकेकडे केलेल्या तक्रारीबाबत बोलताना राजन विचारे म्हणाले, घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट व लोढा गृहसंकुलातील रहिवाशांना विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. काही विकासकांनी चुकीच्या पद्धतीने बांधकामे केलेली आहेत. नाले, तलाव बुजवले आहेत. अनेक बड्या विकासकांनी तर टाऊनशिपच्या नावाखाली नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवले आहे. मात्र इतकी वर्षे पालिकेतील एक हाती कारभार पाहत असतानादेखील गृहसंकुलांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या खासदाराला आता अचानक जाग कशी आली, असा सवाल विचारे यांनी केला आहे. समस्यांच्या नावाखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांची त्यांनी घेतलेली भेट म्हणजे केवळ फुसका बार असल्याची टीकाही विचारे यांनी केली आहे.

भूलथापांना बळी पडू नका!

घोडबंदरच्या गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांना सत्ताधाऱ्यांकडून फसवले जात आहे. त्यांना समस्यांचा निपटारा करण्याचे गाजर दाखवले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन राजन विचारे यांनी केले आहे. नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिल्डर लॉबीकडून स्वतःची दिवाळी गोड करण्यात येत असल्याचा आरोपही विचारे यांनी केला आहे.

याची उत्तरे देणार का?

घोडबंदरच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची बोंब आहे. त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टँकरचे पैसे भरता भरता सोसायटीचे कंबरडे मोडले आहे. त्याकडे कधी लक्ष देणार?

वाहतूककोंडीने ठाणेकर पिचला आहे. गेल्या ८ महिन्यांत १८ जणांचे बळी गेले आहेत. त्यांच्या नुकसानभरपाईबद्दल बोला. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना घेऊन आयुक्तांशी चर्चा करा.

सर्व्हिस रोड मुख्य महामार्गात विलीनीकरण करण्यात येत असताना आणखीन अपघात वाढण्याची शक्यता आहे, त्यावर बोला.

उपमुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने जसे बेकायदा बांधकामावरील दंड माफ केला. तसा या बिल्डरांना दणका द्यायला सांगा?

घोडबंदरमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. हरित महामार्ग ओस झाला आहे. यावर आपण बोलणार का? की फक्त सुपारीच वाजवण्याची धंदे सुरू ठेवणार, असा खरमरीत सवाल विचारे यांनी केला आहे.