राजस्थानमधून गायब झालेल्या 78 पाकिस्तानी नागरिकांविरोधात सर्च वॉरंट

828
प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तानमधून राजस्थानात आलेले 78 पाकिस्तानी नागरिक भूमिगत झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धार्मिक स्थळांना, नातेवाईकांना भेटण्यासाठी, लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी हे नागरिक राजस्थानमध्ये आले होते. पण ते पाकिस्तानमध्ये परतलेच नसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने राज्य सरकारला दिली आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये राहणारे नागरिक धार्मिक स्थळांना, नातेवाईकांना भेटण्यासाठी, लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी याशिवाय इतर कारणांसाठी एकमेकांच्या देशात येत जात असतात. यातही प्रामुख्याने राजस्थान, पंजाबमध्ये येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी आहे. या राज्यांमध्ये आल्यावर पाकिस्तानी नागरिकांना संबंधित एफआरओ किंवा तेथील पोलीस ठाण्यात जाऊन नोंदणी करावी लागते. यावेळी त्यांच्या राहण्याच्या कालावधीचीही नोंद केलेली असते. यामुळे हे नागरिक आले केव्हा आणि जाणार केव्हा याचीही माहिती संबंधित विभागाला ठेवावी लागते.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने राजस्थान सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांची माहिती मागवली होती. त्यातील माहितीत 78 पाकिस्तानी नागरिक मायदेशात गेलेच नसल्याचे व भूमिगत असल्याचे समोर आले. या माहितीनंतर खडबडून जागे झालेल्या राजस्थान पोलिसांनी या नागरिकांची शोधाशोध सुरू केली आहे. आता या नागरिकांविरोधात पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या