ब्रेन ट्युमर होऊनही हार मानली नाही… राजस्थानच्या तरुणीने ‘केबीसी’मध्ये जिंकले 50 लाख रुपये

ब्रेन ट्युमर होऊनही न खचता एका तरुणीने अभ्यास सुरूच ठेवला आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात 50 लाख रुपये जिंकले. तिच्या जिद्दीला, मेहनतीला सलाम. नरेशी मीणा असे या तरुणीचे नाव असून ती 27 वर्षांची आहे. ती राजस्थामधील सवाई माधोपूर जिह्यातील एंडा या लहानशा गावात राहते. ती सध्या राजस्थानमधील महिला सक्षमीकरण विभागात पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे.

नरेशीला ब्रेन ट्युमरचा आजार आहे. पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा पास केल्यावर वैद्यकीय चाचणीदरम्यान तिला हा आजार असल्याचे निदान झाले. या आजारावरील प्रोटोन थेरपी खूप महाग आहे. त्यासाठी 25 लाख खर्च येतो. एवढा खर्च तिच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता.

बिग बी करणार मदत

‘केबीसी’दरम्यान तिने आपल्या आजाराबाबत बिग बी अमिताभ बच्चन यांना सांगितले. ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे. मात्र या ट्युमरचा काही भाग अजूनही तिच्या मेंदूमध्ये आहे. ‘केबीसी’ शो झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या टीमने नरेशी मीणा हिच्याशी संपर्क साधला. प्रोटोन थेरपीसाठी हॉस्पिटल आणि डॉक्टर बघण्यास तिला सांगण्यात आले. तिच्या उपचाराचा खर्च अमिताभ बच्चन करणार आहेत. उपचारासाठी तिने चेन्नई येथील रुग्णालयाशी संपर्क साधला आहे.