28 लाखांचे पॅकेज घेणारा ‘एमबीए’ तरुण निघाला सायबर ठग

तब्बल 400 कोटींचा घपला करणाऱ्या राजस्थानच्या सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी अलाहाबादच्या देवेंद्रला अटक करण्यात आली. एमबीए केल्यानंतर देवेंद्र एका मल्टिनॅशनल कंपनीत 28 लाखांच्या पॅकेजवर काम करत होता. या घोटाळ्याचा तो मास्टर माइंड निघाला.

भरतपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गँगचा प्रमुख शशी आहे. शशी आयआयटी पास असून एका मोठ्या कंपनीत नोकरीत आहे. शशी आणि देवेंद्र मित्र असून दोघांनी मिळून बनावट कंपनी सुरू केली. लोकांना गेमिंग, गुंतवणूक, शेअर बाजारात गुंतवणुकीची लालूच देऊन कोट्यवधी रुपयांना फसवले. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये नकली कंपन्या सुरू करून लोकांना गंडवायचे काम त्यांनी सुरू केले. एका व्यक्तीची 14 लाखांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. याप्रकरणी आतापर्यंत रवींद्र सिंह, दिनेश सिंह आणि त्याची पत्नी कुमकुम हिला अटक केली. मुख्य आरोपी शशी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.