
हिंदुस्थानचा दमदार फलंदाज रजत पाटीदारच्या हाती मध्य प्रदेश संघाचे सर्व फॉरमॅटमधील नेतृत्व देण्यात आले आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून रणजी करंडकासह सुरू होणाऱ्या 2025-26 हंगामापूर्वी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने हा मोठा निर्णय घेतला. पाटीदारने शुभम शर्माकडून ही धुरा स्वीकारल्याची माहिती संचालक चंद्रकांत पंडित यांनी दिली.
मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने पाटीदारच्या जोरदार कामगिरीनंतर त्याच्यासाठी मोठी भूमिका तयार ठेवली होती. 32 वर्षीय पाटीदारला गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान पहिल्यांदा नेतृत्वाची संधी मिळाली. त्यावेळी त्याने पंडित यांच्याशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये नेतृत्वाबाबत चर्चा केली होती.
रजत पाटीदारला यावेळी एमपी संघाचं नेतृत्व देण्यात आले आणि त्याने संघाला फायनलपर्यंत पोहोचवत संस्मरणीय कामगिरी केली. जिथे मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. पाटीदारने आरसीबीला पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आणि नुकतेच त्याने मध्य विभागाचे नेतृत्व करताना 2014-15 नंतर प्रथमच संघाला दुलीप करंडकाचे विजेतेपद जिंकून दिले. मात्र गेल्याच आठवडय़ात शेष हिंदुस्थानचे नेतृत्व करताना त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विदर्भाकडून 93 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.