मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घोटाळेबाज मिंधे-भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरोधात शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कमिशनखोर सरकार आता या दुर्घटनेची जबाबदारी नौदलावर झटकत आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी रविवार, 1 सप्टेंबर रोजी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत.
मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधकामानंतर अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. सोमवारी हा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकसभा निवडणुकीआधी घाईघाईने तयार करण्यात आलेल्या या पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी मिंधे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील बडे नेते उपस्थित होते. मात्र बांधकामानंतर अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारच्या बेजबाबदारपणाची पोलखोल झाल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येणार आहे.
निषेधाचे फलक, धिक्काराच्या घोषणा
1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हुतात्मा स्मारकास वंदन करून गेट वे ऑफ इंडिया येथील शिवरायांच्या पुतळय़ाकडे जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तिथे शिवरायांचा पुतळा दिमाखाने उभा आहे. या ठिकाणी निर्ढावलेल्या, घोटाळेबाज आणि कमिशनखोर सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलकांच्या हाती सरकारच्या निषेधाच्या घोषणेचे फलक तर मुखामध्ये शिवरायांचा जयजयकार आणि सरकारच्या धिक्काराच्या घोषणा असतील.