राजस्थानच्या इतिहासात पहिले लॉकडाऊन, एका डॉक्टरामुळे १३ जणांना संक्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राजस्थानच्या इतिहासात प्रथमच लॉकडाऊन करण्यात आले आहे. राजस्थानातील गेहलोत सरकारने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर रविवारपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.

औषधी, किराणा, मीडिया आणि हॉस्पिटल्स यासारख्या अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद राहील. दरम्यान, भिलवाडा शहरांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे कोरोना संसर्ग झालेल्या एका डॉक्टरामुळे १३ लोकांना संसर्ग झाला. त्यानंतर ६ हजार लोकांची तपासणी करावी लागली. काल शनिवारी बांगर हॉस्पिटलमधील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

बांगर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी ३ डॉक्टरांसहित ६ लोक कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. यापैकीच एका डॉक्टरची पत्नी आणि भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची टीमही येथे पोहोचली आहे. पुढील ७२ तास क्रिटिकल मानले जात आहेत.