दिल्ली सीमेवरून हटवल्यास सरकारी कार्यालयांचे धान्य बाजार बनवू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषि कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांना दिल्लीच्या सीमेवरून हटवण्याचा तसेच दिल्ली सीमा उघडण्याचा प्रयत्न झाला तर देशभरातील सरकारी कार्यालयांचे धान्य बाजार बनवून टाकू असा इशारा शेतकऱयांचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

16 नोव्हेंबर 2020 पासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकरी दिल्लीला लागून असलेल्या टिकरी, सिंघु आणि गाजीपूर सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. दिल्ली पोलिसांनी टिकरी आणि गाजीपूर सीमेवरील आंदोलनकर्त्या शेतकऱयांचे तंबू जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यास सुरूवात केल्याने शेतकऱयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सिंघु, टिकरी आणि गाजीपूर सीमा खोलण्याचा कोणताही निर्णय शेतकऱयांना विचारात घेतल्याशिवाय घेऊ दिला जाणार नाही असा इशारा जगजीतसिंह डल्लेवाल यांनी दिला आह. शेतकऱयांच्या वाटय़ाला जाल तर यंदाची दिवाळी पंतप्रधान निवासस्थानी साजरी करू असा इशाराही भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंह चढुनी यांनी दिला आहे.

केंद्र सरकार, हरियाणा सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि दिल्ली पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी शेतकऱयांशी चर्चा करावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे असा इशारा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.